Blog / बालचित्रकला (ChildART)

बालचित्रकला (ChildART)

Interest · वय ५–१२ · मराठीत

Children painting together in a bright art studio

‘तारे जमीन पर’ मधला ईशान आठवतो का? शब्दांत अडखळणारा, थोडा अबोल असा तो मुलगा — पण चित्र मात्र मोठ्या आत्मविश्वासाने काढतो. जे शब्दांत सांगता येत नाही, ते तो रंगांतून आणि आकारांतून सांगतो. त्याची निरीक्षणं आणि जगाकडे बघण्याची त्याची खास नजर, चित्रांतूनच समोर येते.

ईशानच्या बाबतीत डिस्लेक्सियाचा संदर्भ होता, म्हणून त्याचं उदाहरण थोडं वेगळं वाटतं. पण खरं तर सगळ्याच लहान मुलांचं असंच असतं — ती फक्त शब्दांतून व्यक्त होत नाहीत. त्यांचे डोळे खूप काही टिपत असतात; जग ती अनेक अंगांनी समजून घेतात. म्हणूनच शब्दांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्यातल्या कलेची वाढ होणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

मुलं आणि चित्रकला

लहान मुलं त्यांच्या सगळ्या इंद्रियांतून शिकत असतात. कानांनी जसे ते आवाज आणि मग शब्द समजून घेतात, तसंच डोळ्यांनी ते रंग, आकार आणि पॅटर्न टिपतात. ही क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये असते — पण लहान मुलांमध्ये ती अधिक तीक्ष्ण असते. त्यांच्या संवेदना जागृत असतात, म्हणून त्यांची नजरही वेगळी असते.

म्हणूनच ५ ते १२ हे वय या कलेच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जे मुलांना उपजतच येतं, ते योग्य तंत्रानं आणि सरावानं अधिक सुंदर, अधिक परिपूर्ण होतं. जे भाषेतून सांगता येत नाही, ते चित्रकलेतून व्यक्त होतं — आणि त्यातून मुलांचं व्यक्तिमत्त्वही हळूहळू फुलत जातं.

चित्रलीला निकेतनची ‘बालचित्रकला’

हा सगळा विचार करूनच ‘चित्रलीला निकेतन’नं ‘बालचित्रकला’ हा कोर्स तयार केला आहे. चित्रकलेच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या भोवतालाचं भान देणं, त्यांची निरीक्षणशक्ती तीक्ष्ण करणं आणि त्यांचा दृष्टिकोन व्यापक करणं — हीच या अभ्यासक्रमाची उद्दिष्टं आहेत. हा कोर्स दोन वयोगटांसाठी घेतला जातो:

  • ५ ते ८ वर्षं
  • ९ ते १२ वर्षं

सर्व बॅचेस जून ते मार्च या काळात चालतात, आणि सुट्ट्यांमध्येही वर्ग घेतले जातात. ‘बालचित्रकला’ पूर्ण केलेला विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासनमान्य ‘ड्रॉईंग ग्रेड’ परीक्षांना बसण्यास पात्र होतो.

कौशल्याचा विकास

अनेक मुलांमध्ये चित्रकलेचं अंग उपजतच असतं. ‘बालचित्रकला’ या गुणांना कौशल्याचं रूप देते. चित्र काढण्याची आणि रंगवण्याची वेगवेगळी तंत्रं शिकवून मुलांची कला अधिक विकसित करते. क्ले क्राफ्ट, पेपर क्राफ्टसारख्या गोष्टींमुळे मुलांची ‘मोटर स्किल्स’ही विकसित होतात. पुढे कधी चित्रकला व्यवसाय म्हणून करायची असेल, तर त्याचा पाया इथेच रचला जातो.

कलात्मक दृष्टिकोनाचा विकास

‘चित्रलीला निकेतन’च्या प्रत्येक अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश एकच — आपल्यातल्या कलात्मकतेचा विकास. ‘बालचित्रकला’मध्येही मुलांना तंत्राबरोबरच एक कलात्मक नजर दिली जाते; किंबहुना, त्यांच्यात मुळातच असलेल्या या क्षमतेचा व्यापक दृष्टीनं विकास केला जातो.

तुमच्या मुलातला कलाकार आत्ताच जागा होतोय. अधिक माहितीसाठी अभ्यासक्रम पाहा किंवा आम्हाला WhatsApp करा.